सांगोला वार्ताहर :-
आज सर्वात मोठा प्रश्न हा नाही की कोण काय बोलत आहे. प्रश्न हा आहे की अनुसूचित जातींची ऐक्यशक्ती कशी टिकवायची आणि आरक्षण कसे वाचवायचे.
आपसात आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ, एकमेकांच्या महापुरुषांचा अवमान किंवा जातीय चिखलफेक यातून फक्त विरोधकांचाच फायदा होणार आहे. ज्यांना विभागणी हवी आहे, त्यांच्यासाठी आपणच काम करणार असू, तर त्यातून सामाजिक न्यायाची लढाई कशी जिंकणार?
आरक्षणावरील संकटाला उत्तर सोशल मीडियावरील पोस्ट किंवा रिल्सपुरते मर्यादित राहून मिळणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष समाजात उतरावे लागेल.
वेळ आली आहे—
– अनुसूचित जातींतील सर्व समाजांना एकत्र आणण्याची.
– सामाजिक ऐक्याच्या परिषदांचे आयोजन करण्याची.
– संयुक्त अधिवेशने, साहित्य संमेलने, चर्चासत्रे आणि जनजागृती अभियान राबवण्याची.
– रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई एकत्र लढण्याची.
आपला विरोधक विभागणीचे राजकारण करत असेल, तर आपले उत्तर अभेद्य ऐक्य हेच असले पाहिजे.
आज गरज आहे मोठ्या मनाची, संवादाची आणि समन्वयाची. वैचारिक मतभेद असू शकतात; पण सामाजिक न्याय, संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी आपण एकत्र उभे राहिलो तरच ही लढाई जिंकता येईल.
काळ आणीबाणीचा आहे. प्रति-क्रांती संघटित आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येकाने संघटित कृतीला प्राधान्य दिले पाहिजे.
जय भीम!
जय संविधान! ✊ 💙



